पुणे 24 सप्टेंबर: मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा आज ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.  लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी यावर मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार घालू असा असा इशारा OBC संघर्ष सेनेने दिला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मण हाके,  रामदास सूर्यवंशी,  महाराष्ट्र राज्य गुरव संघटनेचे प्रताप गुरव, माळी महासंघाचे आनंदा कुदळे हे  उपस्थित होते. ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52 टक्के ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी बांधव आंदोलन करणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मराठा समाजाच्या अनेक संघटनांतर्फे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करून ओबीसींच्या आरक्षणातून कोटा देण्याची मागणी होत आहे. त्यांची ही मागणी घटनाबाह्य असून ओबीसींवर अन्याय करणारी आहे. त्याबद्दलचे सविस्तर निवेदन  मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे पाठवित आहोत असेही प्रा. हाके यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता काही मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनाच आवाहन करत 52 टक्के असलेल्या OBC समाज नाराज होणार नाही याची काळजी घ्या असं म्हटलेलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला ईडब्लूएस कोट्याचून आरक्षण देण्याचा निर्णय झाला. गरीब समाजाला न्याय देण्यासाठी निर्णय झाला पण 52 टक्के ओबीसींसाठी या विषयाची चर्चा करणे गरजेचे आहे. मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही असंही त्यांनी ठासून सांगितले.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ओबीसी समाज नाराज होता कामा नये, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा असंही ते म्हणाले.

ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळ यांना निधी मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण त्याचवेळी ओबीसींवर अन्याय नको इतकीच आमची मागणी आहे.

  • Website Designing